Sangli Highschool and Junior College, Sangli

नवीन माहिती

News Icon
गरीब विद्यार्थ्यी सहाय्य योजनेमध्ये प्रतिवर्षी गरीब व होतकरु मुलांना मोफत गणवेश व वहया पुस्तके देण्याची व्यवस्था.

News Icon
'संस्कार विद्यावर्धिनी' अभियानातून, शिक्षकांच्या माध्यमातून प्रश्नांची उकल करणारा असा विद्यार्थी तयार करणे यासाठी हे संस्कार विद्यावर्धिनी अभियान.


शाळेचा इतिहास

थोडसं जुन्या सांगली हायस्कूल विषयी .......

कृष्णा नदीच्या काठी एका उंचावटयावरील सहा गल्ली असलेलं गाव म्हणजे सांगली. १८०१ साली मूळ मिरज जहागिरीतून फुटून पहिल्या चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी वेगळं राज्य बनवलं तेव्हापासून या गावाचा खऱ्या अर्थांनं इतिहास सुरु झाला. शिक्षण हेच आर्थिक, सामाजिक, सांकृतिक विकासाचा पाया असल्याने शिक्षणाचे महत्व ओळखून श्रीमंत धुंडीराज उर्फ तात्यासाहेब पटवर्धन यांच्या काळात सांगली संस्थानात शिक्षणाला सुरुवात झाली. १८६४ साली सांगली इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. सांगलीत इ.१८६४ मध्ये सुरु झालेल्या इंग्लिश स्कूललाच नंतर इंग्रजी माध्यमांचे स्वरुप आले असावे. तत्कालीन संस्थानाधिपती धुंडिराज तात्यासाहेब पटवर्धन यांच्या कारकिर्दीत सुरु झालेल्या या पहिल्या इंग्लिश स्कूलमध्ये इ.स. १८७८ पर्यंत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी होते. या शाळेच्या इ.स. १८८२ मध्ये झालेल्या पुर्नरचनेनंतर सहाव्या इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या शंभरावर पोहोचली त्यावेळी ही शाळा राजवाडयातील एका भागात भरत होती. क्रिकेट आणि गायनाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देणारी ही सांगलीतील पहिली शाळा म्हणता येईल. त्या काळात इंग्लिश स्कूल ही एकमेव सरकारी शाळा होती. याच शाळेची पुढे १८८४ साली 'सांगली हायस्कूल, सांगली' या नावाने शाळा सुरु झाली. हणमंतराव भोसले या प्रख्यात क्रीडाशिक्षकामुळे क्रिकेटपटू विजय हजारे, बॅडमिंटन पटू नंदू नाटेकर यांच्यासारखे क्रीडाक्षेत्रातील नामवंत या शाळेला देता आले. चित्रकला, गायन, तालीम, क्रिकेट अशा विषयांसाठी वेगवेगळा शिक्षक नेमण्याची प्रथा एकेकाळी या शाळेत होती. स्वातंत्र्योत्तर काळात शासनाने ही शाळा १ एप्रिल १९५३ साली तंत्रशिक्षण सुरु करण्याच्या अटीवर लठ्ठे एज्युकेशन सोसायटीकडे हस्तांतरीत केली. शास्त्र शाखेचा उच्च माध्यमिक विभाग १९७५ मध्ये आणि १९८८ मध्ये व्यावसायिक शिक्षण (एम.सी.व्ही.सी.) विभाग सुरु झाला. लठ्ठेतंत्रनिकेतनची सुरवात या शाळेच्या आवारातच झाली. तंत्रशिक्षणासह या शाळेला आधुनिक स्वरुप देण्यात नेमगोंडा दादा पाटील, आमदार कळंत्रेआक्का, अ‍ॅड.केशवराव चौगुले, जी.के. पाटील, टी.के. पाटील, अ‍ॅड एस.एस. पाटील. बापूसाहेब कुंभोजकर आदी मंडळीचा मोठा सहभाग आहे.

वास्तुशिल्प कलेचा उत्कृष्ट नमुना

सांगली हायस्कूलची भव्य इमारत ब्रिटीश कालीन असुन गोथीक वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. दुसरे चिंतामणराव पटवर्धन यांच्या काळात संस्थानचे प्रशासक कॅप्टन बर्क यांच्या कारकिर्दीत इ.स. १९०७-०८ मध्ये निसर्गसुंदर अशा आमराईच्या सानिध्यात सांगली हायस्कूल बांधण्यात आले आणि सांगलीच्या ऐतिहासिक वैभवात भर पडली. सांगली हायस्कूलच्या इंग्रजी स् (एल) आकाराच्या इमारतीची रचना ब्रिटीश वास्तुशास्त्रानुसार आहे. कराडचे मक्तेदार देवी यांच्या वतीने सांगलीतील जुन्या पिढीतील बांधकाम व्यावसायिक गोविंददास आणि केशवदास शेडजी या बंधुनी ती बांधली आहे.
Old College Photo
जुनी इमारत
इमारतीचे वैशिष्टय म्हणजे बांधकामासाठी अत्यंत चिवट अशा चुन्याचा वापर केलेला आहे. कात, गुळ, यांच्या मिश्रणातून चुना आणि भाजीव विटांचा चुरा, उत्तम दर्जाची चुनखडी यांचा उपयोग बांधकामासाठी केलेला आहे. भार (लोड) विभागणीसाठी कमान पध्दत वापरलेली आहे. चार खोल्यानंतर एक हॉल अशी रचना आहे. उंचवर्गखोल्या, नैसर्गिक वायुविजन, इमारतीच्या दर्शनी बाजुस एकशे दहाफूट उंचीची कमान, त्यावर लखलखता कळस,तर्फेवर चालणारे घडयाळ, पोर्चच्या माथ्यावर जाण्यासाठी दोन्ही बाजुंनी चक्राकार असे ओतीव बिडाचे जिने, इमारतीच्या दर्शनी भागावर ३२ पाकळयांचे कमळ, सिंहाची प्रतिकृती, व्हिक्टोरिया क्रॉस, नाजूक नक्षीकाम अशी वैशिष्टये. इमारतीसाठी संपुर्ण सागवानी लाकूड वापरलेले आहे. त्यावेळी नाईक यांनी ते लाकूड काम केले होते. या काळात गायन हॉल, व्यायामशाळा आणि क्रिकेटचे सुसज्ज मैदान अशी खास सोय करण्यात आली होती.या इमारतीने नुकतीच आपली शताब्दी साजरी केली आहे. या शंभर वर्षात असंख्य राजकारणी, समाजकारणी, उद्योजक, साहित्यिक, नामवंत खेळाडू, तंत्रज्ञ असे कीर्तिमान, बुध्दीमान विद्यार्थी घडवले आहेत.

इमारतीचे नुतनीकरण

College Nutanikaran
नवीन इमारत
College Nutanikaran
नवीन इमारतमधील जिना
College Nutanikaran
व्हिक्टोरिया राणीचे शिल्प
लठ्ठे एज्युकेशन सोसायटीची सांगली हायस्कूल सांगली ही एक नामवंत शाखा. दक्षिण महाराष्ट्रात ज्या काही भव्य व देखण्या इमारती आहेत त्यापैकी ही एक  ऐतिहासिक इमारत आहे. सन २००७ या वर्षी या ऐतिहासिक इमारतीला १०० वर्षे पुर्ण झाली आहेत. नैसर्गिक घटकांच्या परिणामामुळे ही इमारत जीर्ण झाल्यामुळे तिला नुतनीकरणाची गरज आहे. आपल्या सारख्याच येथून पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांची निरंतर सेवा करता यावी म्हणून लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. सुरेश पाटील (माजी महापौर) आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या सुंदर आणि दुर्मिळ वास्तुच्या नुतनीकरणाचा निर्धार करुन ते पुर्णत्वास नेले.

१०० वर्षांचा साक्षीदार - ज्ञानवृक्ष

Tree
चिंचेचे झाड
'सांगली हायस्कुल' म्हणजे सांगलीचे वैशिष्टय ! विद्यार्थ्यांना मायेची सावली देणारे, मित्रत्व फुलवणारे, चिंतनशीलता वाढविणारे आणि मागे वळून पहायला लावणारे हे चिंचेचे झाड. एखाद्या वृक्षाचे कमाल वय किती असते याचा विचार करायला लावणारा हा चिंचवृक्ष. गेल्या १०० वर्षांत असंख्य विद्यार्थ्यांनी चिंचेसाठी, लपण्यासाठी, विद्यार्थ्यांनी त्याच्या खोडया काढल्या असल्या तरी जाणाऱ्या खोडसळ, प्रेमळ माजी विद्यार्थ्यांच्या स्मृती जपत आजही तो उंच आकाशी झेपावत सतत वाढत्या संख्येने येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपले पंख पसरत आहे. प्रसिध्द थोर साहित्यिक वि.स.खांडेकर तसेच भूदान चळवळीचे प्रणेते विनोबा भावे यांच्या स्मृती या वृक्षाच्या छायेत लपलेल्या आहेत. या वृक्षाच्या छायेत वि.स. खांडेकर यांची हुशार विद्यार्थी आणि साहित्यिक म्हणून जडणघडण झाली असावी. ललित लेखनाला पोषक अशी सौंदर्यदृष्टी, चिंतनशीलता, निसर्गप्रेम त्यांना या परिसरातच मिळाले असावे. कारण २२ डिसेंबर १९१३ रोजी वि.स. खांडेकर सांगली हायस्कूलमधून मॅट्रीक पास झाले. मुंबई विश्वविद्यालयात त्यांचा आठवा नंबर आला होता. तेव्हाचे संस्कृत शिक्षक श्रीपादशास्त्री देवधर आणि मराठी शिक्षक शंकरशास्त्री केळकर यांच्या रसाळ वाणीने खांडेकरांना मराठी आणि संस्कृत वाचनाची गोडी लागली त्यांच्यातला जागृत लेखक फुलत गेला.

एक प्रेरणा - हुतात्मा आण्णासाहेब पत्रावळे

सांगली हायस्कूल म्हणजे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्रच होते. जेष्ठ नेते वसंतदादा पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या जेल फोडो मोहिमेत हुतात्मा झालेले आण्णासाहेब पत्रावळे या शाळेचेच विद्यार्थी होते.
Annasaheb Patravale
हुतात्मा आण्णासाहेब पत्रावळे
आण्णासाहेब पत्रावळे म्हणजे देशभक्तीचा धगधगता निखाराच होता. 'जेल फोडो' च्या आधीही ते एकदा तुरुंगात जाऊन आले होते. त्यामुळे त्यांची लढाऊ वृत्ती आणखी वाढली होती. 'तुरुंगातून सुटलास बुवा' असे त्यांचे मित्र त्यांना म्हणाले. त्यावर 'मी पुन्हा तुरुंगात जाईन आईएवढीच भारतमाता मोठी आहे. तिच्या मुक्तीसाठी मी मरणार आहे.' असे उत्तर पत्रावळे यांनी दिले होते.ड्रॉईंग हॉललगतच्या वर्गात ते शिकले 'जेल फोडो' मोहिमेत ते 'हुतात्मा' झाले ही बातमी सांगली हायस्कूल मध्ये पोहोचताच विद्यार्थ्यांमध्ये ब्रिटिशांबद्दल संतापाची लाट उसळलेली होती.

सांगली हायस्कूल भूषण - माजी विद्यार्थी

प्रख्यात ज्ञानपीठ परितोषिक विजेते थोर साहित्यिक वि.स.खांडेकर, कविवर्य यशवंत, उदयोगपती आबासाहेब गरवारे, स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा आण्णासाहेब पत्रावळे, बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर, साहित्यिक श्रीनिवास शिंदगी, स्व.आण्णासाहेब लठ्ठे, गुरुनाथ गोंविद तोरो, शीघ्र कवी गोपाळ गोविंद मुजुमदार उर्फ साधुदास, शास्त्रीय संगीताचे गाढे संगीतज्ञ प्रा.ग.ह.रानडे, केशवसुत संप्रदायाचे अध्वर्यु धोंडो वासुदेव गद्रे तथा कवि काव्यविहारी अशी या शाळेची माजी विद्यार्थ्यांची परंपरा आहे.

परदास्याची बेडी होती पायी तव जेधवा
पुत्र शहाणे तुझे दंगले संसारी तेधवा
काही वेडी तयाची भडकुनी गेली मने
क्रांती पूजा केली त्यांनी रुधिराच्या तर्पणे

राष्ट्रयोगिनी माजी आमदार कळंत्रेआक्का, स्वातंत्र्य आंदोलनात प्राणाची आहुती देणारे हुतात्मा आण्णासाहेब पत्रावळे, देशरक्षणार्थ देशाच्या सरहद्दीवर कर्तव्य बजावताना वीरमरण पावलेल्या हुतात्मा स्कॉड्न लिडर अनिल घाडगे, कवी गिरीश, प्रसिध्द कायदेतज्ञ केशवरावजी चौगुले, स्वातंत्र्य सैनिक स्व. आण्णासाहेब पाटील, सिंहगड एज्यु. संस्थेचे संस्थापक प्राचार्य श्री.एम.एन. नवले तसेच मुंबईचे प्रसिध्द स्त्री रोग तज्ञ डॉ. महेंद्र परीख, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, प्रसिध्द ग्रंथीतज्ञ डॉ. वसंतराव खाडीलकर, मा.खासदार प्रकाश बापू पाटील, माजी आमदार प्रा.शरद पाटील आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विजय हजारे, प्रसिध्द बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर, कबड्डीपटू शंकर गावडे, अर्जुन पुरस्कार प्राप्त कबड्डीपटू राजू भावसार, वेटलिफ्टींग चॅम्पियन अनिल पाटील, राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू आसिफ मुल्ला यांच्या सारखे कीर्तिमान माजी विद्यार्थी याच हायस्कूलचे विद्यार्थी आहेत.